काव्यसंग्रह

  ना

 

 

रुबाया हा काव्यप्रकार आणि इतर छंद किंवा वृत्त

रचनातील कविता ह्या रुबाया हा काव्यप्रकार जो रॉय किणीकर यांनी प्रसिद्धीस आणला त्यात आणि इतर छंदांमध्ये किंवा वृत्तांमध्ये आहेत.

मंगेश पाडगावकरांची प्रस्तावना व प्रकाशन

रचना ह्या काव्यसंग्रहास महाराष्ट्र भूषण, पद्मश्री श्री. मंगेश पाडगांवकर यांची प्रस्तावना असून ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन देखील त्यांच्याच हस्ते संपन्न झाले..

गीतरचनेस अनुकूल शब्दयोजना

बहुतांश कवितांना गेयता असल्यामुळे त्याची गीतरचना होऊ शकते.

स्क्रोल करीत रहा

सौभाग्यकांक्षिणी

सौभाग्यकांक्षिणी अधोवदन अधरात,
दडपते शल्य जे उरात खुपते आत
नववधू ल्यायले आज नवा हा साज
टाकून कालच्या जुन्या प्रितीची कात

मेहंदीने भरले हात, अलंकृत काया,
मी लग्नवेदीवर आज निघाले जाया,
त्या आणाभाका, शपथा, वचने सारी,
या हवनातून ते जळून जाईल वाया


शतदीप उजळले पेटून ठायी ठायी
या लग्नमंडपी लगबग सगळी घाई
नयनांचे भरले कुंभ, दिसेना काही
विसरून जा "त्या" ला सांगत होती आई

मग मुहूर्त झाला, भरले घटिकापात्र
मंगलाष्टकांनी शहारले हे गात्र
अंतरपाटाच्या पुढे नवा भरतार
अन् अंतर्मनीच्या आत तूच सुकुमार !

हा दिवस संपुनी येईल पहिली रात्र
मम देहाचे हा प्राशुनी घेईल पात्र
तुटतील कंकणे, सरकून जात वस्त्र
त्या स्पर्शामध्ये आठवशील क्षणमात्र !

नायकीण

दरबारी नायकीण
सातासुरांत गायची
तिची ऐकण्यास तान
रात्र अधीर व्हायची !

तिचे कमनीय रूप
जणू रेशमाचे शिल्प
तिच्या रंध्रात शिराया
वारा यायचा समीप !

तिच्या मांसल देहात
दिसे काचोळी ही तंग
आणि दंडात रुतले
मोतियांचे बाजूबंद
तिचा आलाप गुंजतो
नगरात, वनोवनी
वाजे जसे अलगुज
द्वारकेच्या कानोकानी !

एक कृष्णछाटा होती
तिच्या मनाच्या आकाशी!
त्याचे सूर जुळलेले
थेट मीरेच्या वीणेशी !

नृत्यगारी नाचताना
कधी विचलित होई
टंच पान्हा उरावर
तिच्या तान्ह्यासाठी होई !

रंगमहाली या इथे,
फुले साऱ्यांच्याच पायी
आणि साठला सुगंध
अत्तराचा फाया होई !

मैफिलीला लाभलेला
तिच्या नुपूरांचा सूर !
कुना ऐकूही ना आले
तिच्या मनीचे काहूर !

आज नाही नृत्यालयी
तिचे नर्तन बेधूंद
कळीकाळाला भिडले
तिचे आवेग बेबंद !

कवितांसाठी स्क्रोल करा
आक्रोश

धरणीवर कोसळतो केवळ
आक्रोश या नभाचा !
आणि कडाडून जाते वीज
अंतरंग तिचे वाचा !

वृक्ष कापले, फुले तोडली
दूर्वाही खुडलेल्या !
उंच उंच प्रासादांखाली
व्यथा किती बुडालेल्या !

झाकोळून टाकती नभाला
उष्ण धुरांचे लॉट !
उमलून येण्याआधी कळ्यांचे
कुणी कापले ओठ?

कर्णफॅटत्या कर्कश ध्वनीचा
जिथेतिथे उच्छाद !
किरकिरती ना रातकिडे
पक्ष्यांचे विरले नाद !

थांबशील का? मर्त्य मानवा
खेचून स्वार्थलगाम !
पहा एकदा धरणीचे
कंठात अडकले प्राण !

अडली धरती आर्त पुकारी
नभालयीच्या मेघा !
झडली पाने, खुडले अंकुर
कितीक पडल्या भेगा !

मेघांच्या आतून कडाडे,
संतापून मग वीज !
सागरासही लाजवते
ती आकाशाची गाज !

धरणीवर कोसळतो तेव्हा
आक्रोश या नभाचा !
आणि कडाडून जाते वीज
अंतरंग तिचे वाचा !

अस्तित्वाच्या पोकळीचं चिंतन

समृद्ध जगण्याच्या हव्यासाने बांधलेला
प्रत्येक स्वयंकेंद्रित; स्वार्थी नसतोच!
असतात भोवतालचे आत्महिन संदर्भ
हपापलेले!
पिसाटून गिळायला उठलेल्या अजगरासारखे!
सभोवतालच्या पसरत जाणाऱ्या
विषण्ण अंधारयात्रेत
चाचपडत शोधावं लागतं प्रत्येकालाच
आपल्या आत्मभानाचं
हरवत चाललेलं अस्तित्व!
आणि दिशाहीन समुद्रप्रलयात
झोकून दिलेली असते आयुष्याची नाव
आणायची असते त्वरेने
सत्वशील तरीही नि:सत्व किनाऱ्यावर!
पांगळ्या तत्वांची घरटी विणत बसताना
पाखरं विसरून जातात
पंखातलं सामर्थ्य!
आकाश खुणावत राहतं पण
पिचून जाते त्यांच्या स्वप्नांची भरारी
एका भावशून्य वर्तुळात
काट्याकुट्यांच्या घरट्याच्या!
ज्यांनी कधी सूर्याला सलामच केला नाही
ते अंधाराचे पाईक
प्रकाशावर सत्ता गाजवतात
आणि काही काळ
प्रकाशाने सत्ता गाजवलीच
तरी येताजाता त्याला
संधिप्रकाशनं डागाळतात
शेवटी जगणं खरं की मरणं?
हाच प्रश्न आहे
गगनभरारी की घरटं?
हाच प्रश्न आहे!
आणि अंधार खरं की प्रकाश?
हाच प्रश्न आहे!

मुंबई फास्ट

किती प्रचंड गर्दी, कोलाहल हा सारा,
शांतता मागते पसरून पदर निवारा,
पण कुणास नाही वेळ, बधिर जन सारे,
अन गोंगाटाचे गीत पिसाट वारा !

या ध्वनिक्षेपकामागून येते गाडी,
थांबुनी जराशी फलाटास ती सोडी,
उतरते पिलावळ, आत गच्च भरलेली,
जाताना दिसते तरीसुद्धा भरलेली !

हे असंख्य जंतू, वळवळती दिनरात,
कुणी आनंदात, दिसे कुणी चिंतेत,
आश्चर्य, ताण, अन भीती इथे भरलेली,
चिंतेत उद्याच्या रात्र काळ सरलेली !

या गर्दीला ना ओळख, नाही जाण,
जो तो वावरतो, मुठीत धरुनी प्राण,
कालचा प्रवासी, आज नसे शेजारी,
अन उद्या कोण याचेही हो अज्ञान !

लटकटी जीव, दारात रोज अश्राप,
मुंग्यांनी न्यावा जणू मेलेला साप,
अडकून तारेला, धडकून व खांबाला,
किती संपून गेले, नाही मोजमाप !

भजनात गुंतले हात, बडविती टाळ,
गर्दीत उडाला भक्तीचा कल्लोळ,
घटकाभर रंजन चाले खिन्न प्रवासी,
अन वेळेच्या पश्च्यात धावतो काळ !

क्षणभरात झाला स्फोट, उडाले दार,
रक्तांचे फुटले कुंभ, तडकले पार,
भंगले टाळ हे तुटून पडल्या हाती,
रक्तात बुडाली, परमेशाची भक्ती !

संपूनच गेली आज उद्याची चिंता,
गे गेले त्यांचे स्मरणच उरले आता,
मांडला कुणीतरी तीन पत्तीचा डाव,
दैनिके सांगती, 'जीवन याचे नाव' !

महाराष्ट्र राज्य पुरस्कार विजेती कविता