काव्यसंग्रह

अरण्यवाचन

अरण्यवाचन

रुबाया हा काव्यप्रकार आणि इतर छंद किंवा वृत्त

अरण्यवाचनतील कविता ह्या रुबाया हा काव्यप्रकार जो रॉय किणीकर यांनी प्रसिद्धीस आणला त्यात आणि इतर छंदांमध्ये किंवा वृत्तांमध्ये आहेत.

मंगेश पाडगावकरांची प्रस्तावना व प्रकाशन

अरण्यवाचन ह्या काव्यसंग्रहास महाराष्ट्र भूषण, पद्मश्री श्री. मंगेश पाडगांवकर यांची प्रस्तावना असून ह्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन देखील त्यांच्याच हस्ते संपन्न झाले..

गीतरचनेस अनुकूल शब्दयोजना

बहुतांश कवितांना गेयता असल्यामुळे त्याची गीतरचना होऊ शकते.

राधा

अजून इथल्या फुलाफुलांतून उमलून येते ओले मार्दव
कळ्यापाकळ्यांच्या भवताली भ्रमरांचे होते गुंजारव
रवीकिरणांची स्वर्णपताका पदर धुक्याचा धरुनी येते
अजूनी इथल्या कृष्णासाठी राधा वेडी व्याकुळ होते


अजूनी मंदिरी ऐकू येते, आर्त भक्तीची उत्कृष्ट साद
कृषिवलांच्या खिल्लारांच्या शिवरातला घुंगरूनाद
अजूनी हळवे होते अंगण, रांगोळीच्या पावित्र्याने
अजूनी तुळशी वृंदावन हे उजळून जाते दिव्या दीपाने
जेव्हा घुमत बासरी, कुंजवनातून ऐकू येते
अजून इथल्या कृष्णासाठी राधा वेडी व्याकुळ होते !


कलामंदिर कलोपासना अजून येथे पूजिली जाते
संगीत, गायन, नृत्यमंदिरी पदन्यास हा घुमवित जाते
मल्हाराचे सूर भिडूनी अस्मानातून वर्षा होते
अजून इथल्या कृष्णासाठी राधा वेडी व्याकुळ होते !


अजून इथल्या पर्वतराजी मंतरलेल्या अद्भुत सुंदर
संगीत निर्मित खळाळणारे रानीवनीचे निवांत निर्झर
अवचित जेव्हा मयूरपिसांची रंगसंगती प्रकटून जाते
अजून इथल्या कृष्णासाठी राधा वेडी व्याकुळ होते !


कोकण

एकदोनदा सजते, कोकणात माझे घर !
बाकी धुळीवर धूळ आणि केरावर केर !
लाल मातीतून जाता
कुठे उमाटे पाउल !
जातानाच दिसतात,
नाही येण्याची चाहूल !
घराशेतातून वाहे एक उदास लकेर
एकदोनदा सजते, कोकणात माझे घर !
बाकी..


बंद घरे दरवाजे,
कडेकोट कुलपात !
उरी जळत म्हातारी,
कुठे लावे सांजवात !
सुरकुतलेल्या देही आठवणींचे काहूर
एकदोनदा सजते, कोकणात माझे घर !
बाकी..


माड उंच उंच उभे,
नारळाला नाही धनी !
काजू वर्षात एकदा,
त्यांना विचारते कोणी ?
आंब्यालाही नाही येत आता पूर्वीचा मोहोर !
एकदोनदा सजते, कोकणात माझे घर !
बाकी..


भात शेती, पायवाटा
उदासून पसरल्या !
वडापिंपळाच्या येथे
गूढ, भयाण सावल्या !
मोट ओढण्याची वाट, खोल पहाटे विहीर
एकदोनदा सजते, कोकणात माझे घर !
बाकी..


कधीतरी उजळती
घरे, सणा उन्हाळ्यात !
गणपती, गजबज,
चार दिस आनंदात !
धूळ पडल्या पेटीचा काही क्षणाचा झंकार !
एकदोनदा सजते, कोकणात माझे घर !
बाकी..


सारे विझुनच जाते,
पुन्हा सदासर्वकाळ !
घरदार नदीनाले,
शेते, पायवाटा, माळ !
पुन्हा जीव कासावीस, पुन्हा तीच हुरहूर !
एकदोनदा सजते, कोकणात माझे घर !
बाकी धुळीवर धूळ आणि केरावर


कवितांसाठी स्क्रोल करा
संध्या

स्वरांतिक संध्या, निळाशार दर्या
आणि सूर्य अस्तास जातो जिथे !
कळ्यापाकळ्यांच्या तुझ्या पावलांची,
पैंजणे स्पर्शण्या लाट धावे तिथे !

स्थिरावून गगनी, रवी तो पहातो,
तुझे मूर्त सौंदर्य भांबावून !
आणि पूर्व क्षितिजावरी मंद तारे,
निशेच्या रुपेरी महालातून

तुझ्या ओंजळीच्या जळातून दिसते
सुवर्णात न्हाले निळे अंबर
कुणाला पाहावे ? तुला कि त्याला ?
संदेह दाटे मणी क्षणभर !

अशा आठवांचे किती सांजपक्षी,
मनाच्या आकाशात झेपावती !
सदा संधीकाली तुझी याद येता,
कडा नेत्रीच्या रोज पाणावती !

बुलबुल

चुकार येते एक पाखरू रोज अंगणात,
किलबिलते अन उडून जाते उंच आकाशात |
चुकार म्हटले आधी, पण हा नित्याचा क्रम
बोलण्यास पाहे कधीतरी ते हृदयाआतून |

रोज भरारी घेऊन जाते गगनाच्या पार
कळे न त्याची माझी कोठे जुळलेली तार ?
काय नेमके सांगण्यास मज हे रोज उडुनी येते ?
असेल का त्याचे नी माझे गतजन्मीचे नाते ?

कुणीतरी सांगितले मज तो बुलबुल पक्षी आहे !
लालबुड्याच्या शिरी तयाच्या एक तूराही आहे !
रोज गवसला छंदच आता नित्य निरखणे त्याला
काळीज हलते एक दिवसही उशीर त्याला झाला |

कळे न मजला त्याची आणि त्याला माझी भाषा |
कळेल कधीतरी हीच भाबडी बाळगून मी आशा |
आताशा मी पाणी ठेऊन दाणे टाकीत बसतो |
कृतज्ञतेचा असा सोहळा रोज अंगणी घडतो |

गोल गोल फिरवून मान तो मला, मी त्याला बघतो |
निघून जाताना तो थोडा मिश्किलतेने हसतो |
चार दिवस तो आला नाही, वाट पाहतो आहे |
शून्यामध्ये आकाशाच्या नजर रोखुनी आहे |

वणवा कोठेतरी लागला, जंगल जाळले सारे |
पाचोळ्याच्या राखेसंगे, उष्ण वाहती वारे
ना कोठे तो बुलबुल आता, नाही चाहूल त्याची
देऊन गेला उरी जखम तो आता जन्मभराची |

चाळ

चाळीतल्या त्या नळास नव्हते पण डोळ्यातून येते पाणी !
सवंगड्यांच्या संगे जेथे वाजवीत फिरलोय पिपाणी !

रेशनिंगच्या दुकानावरी भल्या पसरल्या मोठ्या रांगा !
मालक येई शटर उघडण्या दात विचकूनी टाकीत टांगा !

लपाछपी, भोंज्या अन गोट्या पत्ते, कॅरम आणि सोंगट्या !
मलाही घ्या ना खेळायाला, लहान कोणी रडे बेंबट्या !

चाळीमधले लगीन म्हणजे उत्सव होता साऱ्यांचा !
निरोप देताना बहिणीला, पाटच वाहे अश्रूंचा !

गणपती आणि देवी आणि अशी दिवाळी आतषबाजी
मिळून साऱ्याजणी तळाया फराळ करती काकू, आजी !

भांडण कांडण साधे नव्हते, तारस्वरातील शिव्याशाप ते
काही दिसांनी हातमिळवणी, काही दिसांनी आलिंगन ते !

बालपणीचे उनाड दिन ते, चाळीमधल्या आपुलकीचे
काव काव अन पाव पाव ह्या प्रातःस्मरणी भूपाळीचे !

घराघरातून विविधभारती, मर्फी रेडिओवरील गाणी !
भातुकलीच्या खेळामध्ये रमून गेले राजा राणी !

जुनी बिऱ्हाडे सोडून गेली, ओळखीचे ना उरले कोणी !
चाळ पाडूनी त्यावरती हा उंच बांधला टॉवर त्यांनी !

चाळीतल्या त्या नळास नव्हते पण डोळ्यातून येते पाणी !
सवंगड्यांच्या संगे जेथे वाजवीत फिरलोय पिपाणी !