राज गोखले

मनोगत

विनम्र अभिवादन...मी राज गोखले

जगणं ही एक मौज आहे आणि जगणं हे एक आव्हान सुद्धा आहे. सुख हे मानण्यावर आहे असे म्हणतात ...पण सुखाच्या व्याख्या जशा बदलत गेल्या तशा यशस्वी होण्याच्या व्याख्या सुद्धा बदलत गेल्या. वाचन , मनन, चिंतन हरपत चाललेल्या आजच्या काळात अभिरुची घसरत चाललेली दिसताना मनाला क्लेश होतातच...कारण मन एका संवेदनशील कवीचं आहे , एका प्रयोगशील शिक्षकाचं आहे. एक समाजाचा आत्मा घडवतो आणि दुसरा समाजाला शिस्त लावतो. कलावंत मग तो अभिनेता, दिग्दर्शक, पटकथालेखक, चित्रकार, गीतकार, संगीतकार असो अथवा लेखक किंवा कवी असो...सभोवताली घडणाऱ्या गोष्टींचं नेमकं प्रतिबिंब त्यांच्या मनात उमटत असतं. सर्वसामान्य आणि कलावंत यांच्यातला फरक हाच की सामान्य माणसाला पाणी हलताना दिसतं, आणि कलावंताला त्यात वलयांची रांगोळी दिसते. सामान्य माणसाला फुलांच्या पाकळ्यांवर पडलेले दवबिंदू दिसतात तर कलावंताला त्या प्रत्येक बिंदूत सामावलेल अवघं आकाश ! समोरच्याची वेदना ज्याला दिसते तो सामान्य डॉक्टर आणि ज्याला ती सहवेदना स्वतःची वाटून हृदयातून कळ येते तो कलावंत ! वासरू लुचल्यानंतर काही वेळाने त्याला अमानुषपणे दूर लोटून , स्वतःची दुधाची घागर भरतो तो सामान्य माणूस आणि वासरू दूध पिताना, त्या वात्सल्याच्या रूपाला डोळ्याचं पारणं फिटेपर्यंत पाहत राहतो तो कलावंत ! घागर त्याचीही भरली जाते पण ती भरतो तो विश्र्वनियंता , प्रतिभेच्या अमृत रसाने !

कलावंत असला तरी माणूस तो , जगण्याचा संघर्ष काही त्याला चुकलेला नाही ! कलेवर आयुष्य उधळून दिलेले आणि अखेरपर्यंत भणंग राहिलेले कलावंत मी पाहिले आणि वाचले आहेत. मला असे कधीच जगावेसे वाटले नाही...त्यामुळे व्यवहारिक आयुष्यातल्या संघर्षाला अखेरपर्यंत तोंड देणे आलेच आणि अपरिहार्यपणे त्यात जिंकणे सुद्धा ! ज्याला हा समतोल साधला तो जीवनाचा खरा कलावंत ! अर्थात हे माझे मत !

4+

काव्यसंग्रह तसेच दहावीची गाईड्स

150+

व्याख्याने

20+

शिक्षण क्षेत्रातील अनुभव

30+

पुरस्कार

follow
me on instagram